Nandurbar Crime : सावऱ्यादिगर (ता. धडगाव) गावातून सरपंचाचे अपहरण करून त्याला तब्बल 800 किलोमीटर दूर नेऊन गोठ्यात डांबल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोड कामासाठी अडकलेले पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने सांगली येथील ऊसतोड ठेकेदारांनी हे अपहरण केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अपहरण झालेल्या सरपंचाचे नाव दिलीप पावरा (रा. सावऱ्यादिगर) असे असून, त्याच्या अपहरणामागे सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील ऊसतोड ठेकेदार पोपट दिलीप शेवाळे, त्याचे दोन भाऊ व अन्य चार जणांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जुन्या आर्थिक व्यवहारातून अडकलेले पैसे वसूल करण्यासाठी सरपंचाचे सिने-स्टाईल अपहरण करण्यात आले.
नेमकी घटना काय? (Nandurbar Crime)
सरपंच दिलीप पावरा यांना धडगाव शहरातून गाडीत बसवले. त्यानंतर गाडीतच त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांचे दोन्ही हात बांधले आणि तब्बल 800 किलोमीटर दूर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका गावात घेऊन गेले. तेथे नेऊन त्यांना एका गोठ्यात डांबून ठेवले.
सदर अपहरणाची माहिती गावकऱ्यांना व कुटुंबीयांना समजताच त्यांनी तत्काळ धडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. 24 तासांत सुटका झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा गावकऱ्यांनी दिला. सरपंचाची सुटका व्हावी यासाठी गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही सुरू केलं.
दरम्यान, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन धडगाव पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. तांत्रिक तपास करून ठोस माहिती मिळताच धडगाव पोलिसांनी विशेष पथक तयार केलं. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने धडगाव पोलिसांचं विशेष पथक सांगलीकडे रवाना झालं. त्यानंतर योग्य वेळ साधून सांगली जिल्ह्यात सरपंच डांबून ठेवलेल्या गोठ्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि सरपंचाची सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी या अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.







