
Dhule Accident : धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडी रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाघाडी टी पॉइंट जवळ बोअरवेल ट्रॅक्टर आणि ॲपे रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या बोअरवेल ट्रॅक्टरने समोरून येत असलेल्या ॲपे रिक्षाला धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की ट्रॅक्टरवर ठेवलेला बोअरवेलचा मोठा पाईप थेट रिक्षामध्ये घुसला. त्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले. रिक्षामध्ये बसलेले प्रवासी घाबरून गेले आणि काही जण रस्त्यावर फेकले गेले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताचा संपूर्ण प्रकार दिसत आहे. रिक्षामधील एक महिला धडकेनंतर रस्त्यावर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. जखमींना तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदत केली. परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच बोअरवेल ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे असे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे मत आहे. रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.






