Crime News: अहिल्यानगर, ता. 25 : अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कामरगाव परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल 2.1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी चार आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

व्यावसायिक गॅस टँकरमधून अनधिकृतपणे गॅस काढून तो छोट्या टाक्यांमध्ये भरला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने कामरगाव परिसरातील संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी गॅस रिफिलिंगचा कारखाना सुरू असतानाच पोलिसांनी आरोपींना पकडले.
या कारवाईत पोलिसांनी तीन मोठे गॅस टँकर आणि रिफिलिंगसाठी वापरले जाणारे तांत्रिक साहित्य असा एकूण 2 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात असे समोर आले आहे की, परिसरात गॅसचा पुरवठा कमी असल्याचा फायदा घेऊन आरोपींनी हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला होता. कोणतीही सुरक्षा मानके न पाळता केल्या जाणाऱ्या अशा रिफिलिंगमुळे भीषण आग लागणे किंवा स्फोट होऊन मोठी जीवितहानी होण्याचा धोका असतो. केवळ नफ्यासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त केला आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. हे रॅकेट किती काळापासून सुरू होते, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, आणि हा बेकायदेशीर गॅस स्थानिक बाजारपेठेत कुठे विकला जात होता, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.






