Ashok Kharat Case : नाशिक : नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याचा आरोप असलेल्या खरातच्या कृत्यांबाबत दररोज नवीन माहिती उघड होत आहे. तपासात असे आढळून आले आहे की, पीडित महिलांशी संबंध ठेवताना त्यांना नकळत काही औषधे दिली जात होती.

विशेष तपास पथकाच्या चौकशीतून ही बाब समोर आली असून, या औषधांचा वापर नेमका कशासाठी केला जात होता याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, महिलांना गर्भधारणा होऊ नये यासाठी काही गोळ्या दिल्या जात असाव्यात, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र ही औषधे खरात स्वतः देत होता की त्यामागे वैद्यकीय सल्ला होता, याबाबत तपास सुरू आहे.
या प्रकरणात नाशिकमधील काही डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. खरातच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली जात असून, औषधांचा पुरवठा कुठून होत होता याची सखोल तपासणी केली जात आहे.
दरम्यान, काही पीडित महिलांनी दिलेल्या जबाबांनुसार, खरातच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना गुंगी येत असल्याचे जाणवत असे. त्यामुळे संमोहन किंवा गुंगी आणणाऱ्या औषधांचा वापर केला जात होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर तपास अधिक गंभीर करण्यात आला आहे.
तपास पथक आता तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करत असून, संबंधित क्लिनिक आणि मेडिकल स्टोअर्समधील नोंदी तपासल्या जाणार आहेत. या तपासातून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







