Mukhyamantri Teerth Darshan Yojana : महाराष्ट्र शासन कडून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Scheme) यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी या योजनेची प्रक्रिया मंदावल्याने ही योजना बंद करण्यात आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी देणे हा होता. सुरुवातीला या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
जालना जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण 5722 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी फक्त 929 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित 4793 अर्ज अजूनही प्रलंबित आहेत किंवा छाननी प्रक्रियेत आहेत. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेची संधी मिळालेली नाही. तसेच, ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, अशा 1239 लाभार्थ्यांना कधी बोलावले जाणार याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात सुरू आहे की बंद करण्यात आली आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. या योजनेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोठी आशा होती. मात्र, सध्या प्रक्रिया थांबल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने या योजनेबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता असून, योजनेचे भवितव्य काय असेल हे लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



