छत्रपती संभाजीनगर: अवघ्या काही दिवसांत ‘गोरे’ होण्याचे आमिष दाखवणाऱ्या पाकिस्तानी सौंदर्याप्रसाधनांनी आता तरुण-तरुणींच्या थेट किडनीवर परिणाम केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदी असूनही छुप्या पद्धतीने विकल्या जाणाऱ्या या घातक क्रीम्सवर सिटी चौक पोलिसांनी मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन दुकानदारांना बेड्या ठोकल्या आहेत.

शहरातील शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील ‘हायलाईट कलेक्शन’, ‘ओम ट्रेडर्स’ आणि ‘फलक इम्पोरियम’ या दुकानांमध्ये बंदी असलेल्या पाकिस्तानी क्रीम्सची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा आणि फेस फ्रेश यांसारख्या विविध ब्रँडच्या क्रीम्स, साबण आणि सिरमचा साठा जप्त केला.
धक्कादायक बाब म्हणजे, या क्रीम्समधील रसायने त्वचेवाटे रक्तात शोषली जातात. यामुळे शरीरातील फिल्टरेशन सिस्टिमवर ताण येऊन थेट किडनी निकामी होण्याचा धोका असतो. अनेक तरुण-तरुणींनी आरोग्य बिघडल्याच्या तक्रारी केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे.
हे इतके घातक का आहे?
पाकिस्तानी बनावटीच्या या स्वस्त क्रीम्समध्ये ‘पारा’ आणि ‘स्टिरॉइड्स’ चे प्रमाण प्रमाणाबाहेर असते. सुरुवातीला ही क्रीम्स त्वचा उजळल्याचा भास निर्माण करतात, मात्र कालांतराने त्वचा पातळ होते, चेहऱ्यावर कायमस्वरूपी काळे डाग पडतात किंवा त्वचा जळल्यासारखी होते.







