Thane News : ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात एक गोंधळाची घटना घडली, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे समोर आले आहे. दोन सख्या बहिणी आपल्या आईला भेटण्यासाठी कल्याणहून ठाण्याकडे जात होत्या. त्यांच्याकडे सामान जास्त असल्यामुळे त्यांनी दोन वेगवेगळ्या ओला कार बुक केल्या होत्या.

पहिली कार आल्यानंतर मोठ्या बहिणीने काही सामान आणि 11 वर्षांची लहान बहीण हिला त्या कारमध्ये बसवले. चालकाला ओटीपी दिल्यानंतर ती दुसऱ्या कारमध्ये उरलेले सामान ठेवण्यात व्यस्त झाली. याच दरम्यान पहिली कार निघून गेली. काही वेळाने मोठ्या बहिणीने चालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे ती घाबरली आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली.
सुमारे दीड तास ती चिंतेत होती. लहान बहीण कुठे गेली याची माहिती नसल्याने मोठी बहीण रडू लागली. शेवटी तिने 112 हेल्पलाईनवर संपर्क साधला. माहिती मिळताच कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी या प्रकरणाची माहिती घेतली आणि शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, काही वेळाने चालकाचा फोन आला आणि तो कळव्याजवळ पोहोचल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला तात्काळ परत येण्यास सांगितले. काही वेळातच कार परत आली आणि लहान मुलगी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. बहिणीला सुरक्षित पाहताच मोठ्या बहिणीने सुटकेचा निश्वास टाकला.
या घटनेत कोणताही गैरप्रकार झाला नसला तरी बेपर्वाईमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे कुटुंबाला दिलासा मिळाला.






