Nanded News : नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील आलेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रेड्यांच्या टकरीदरम्यान (Fight Between Buffalo ) एका निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या घटनेत 17 वर्षांचा खंडू झम्पलवाड या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना रविवारी 15 फेब्रुवारी रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आलेगाव येथील काही ग्रामस्थांनी मनोरंजनासाठी रेड्यांच्या टकरीचे आयोजन केले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील अनेक गावांमधून मोठी गर्दी जमली होती. कार्यक्रम सुरू असताना शेवटची टक्कर सुरू होती. यावेळी अचानक एका रेड्याने गर्दीत उभ्या असलेल्या मुलाकडे धाव घेतली आणि जोरदार धडक दिली. या धडकेत बाचोटी येथील रहिवासी असलेला खंडू झम्पलवाड गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जखमा गंभीर असल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. खंडू हा अवघ्या 17 वर्षांचा असून तो दहावीच्या परीक्षेची तयारी करत होता. काही दिवसांतच त्याची बोर्ड परीक्षा सुरू होणार होती. शिक्षण घेऊन पुढे काहीतरी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाचा अशा पद्धतीने अंत झाल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
खंडूच्या मृत्यूची बातमी समजताच बाचोटी आणि परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली. अनेक नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेड्यांच्या टकरीसारख्या खेळांमुळे अनेकदा प्राणी आणि माणसांच्या जीवाला धोका निर्माण होतो, तरीही अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते, हे चिंतेचे आहे. कोणतीही सुरक्षितता न ठेवता कार्यक्रम आयोजित केल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
या घटनेची नोंद उस्माननगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. प्रशासनाने अशा धोकादायक कार्यक्रमांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







