बीड: महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस (Beed News) आल्यानंतर अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या जाळ्याबाबत राज्यभरात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. खरातच्या कथित (Ashok Kharat Case) कारनाम्यांमुळे अनेक महिलांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण झाल्याचे समोर येत असताना, या प्रकारांची मुळे इतर जिल्ह्यांतही खोलवर रुजलेली असल्याचे आता स्पष्ट होत आहे. बीड जिल्ह्यातून समोर आलेली माहिती याचेच गंभीर चित्र उभे करते. (Latest Marathi News)

गेल्या 5 वर्षांत बीडमध्ये अशाच प्रकारच्या 9 भोंदूबाबांवर कारवाई करण्यात आली आहे. जरी येथे शारीरिक शोषणाची प्रकरणे कमी प्रमाणात आढळली असली, तरी विधी, पूजा आणि ‘दैवी उपाय’ यांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. विशेषतः ‘गुप्तधन काढून देतो’, ‘व्यवसायात झटपट यश मिळवून देतो’, ‘अपत्यप्राप्ती होते’ किंवा ‘सततच्या आजारातून मुक्ती मिळते’ अशा आमिषांमुळे अनेक जण या जाळ्यात अडकले.
काही प्रकरणांमध्ये भोंदू स्वतःला देवाचा अवतार असल्याचे भासवत, लोकांच्या भीतीचा फायदा घेतात. ‘घरावर करणी झाली आहे’, ‘पितृदोष आहे’ अशा कारणांनी लोकांना घाबरवून मोठी रक्कम उकळली जाते. सोन्याचे दागिने ‘शुद्ध’ करण्याच्या नावाखाली ते लंपास केल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. इतकेच नव्हे, तर ‘माझा शब्द मोडला तर अनर्थ होईल’ अशी भीती दाखवत काही कुटुंबांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवण्याचे प्रकारही उघड झाले आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये 7 गुन्हे दाखल करत 9 भोंदूबाबांना अटक केली आहे. मात्र, अशोक खरात प्रकरणानंतर या साखळीची व्याप्ती अधिक मोठी असल्याचा संशय बळावत आहे. त्यामुळे संशयित मठ, धार्मिक स्थळे आणि अशा व्यक्तींवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.







