जालना: भिंतीवर डोके आपटून नवविवाहित सुनेने सासूची निघृण हत्या केली. ही धक्कादायक घटना भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली. खून केल्यानंतर मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होता; परंतु वजन जास्त झाल्याने आरोपी सुनेला मृतदेह उचलता आला नाही. त्यामुळे तिने मृतदेह असलेली गोणी तेथेच टाकून साथीदारासोबत दुचाकीवरून पलायन केले. या घटनेनंतर जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. सविता संजय शिनगारे (४५, मूळ रा. वावरे अंतरवाली, ता. गेवराई, जि. बीड) असे मयत सासूचे नाव असून, प्रतीक्षा अक्षय शिनगारे (२३) असे संशयित सुनेचे नाव आहे.

सहा महिन्यांपूर्वीच लग्न होऊन प्रतीक्षा शिनगारे कुटुंबाची सून झाली होती. दरम्यान, सदर मयत सविता शिनगारे यांचे पती संजय शिनगारे यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने ती आणि मुलगा अक्षय हे सोबत राहत होते. अक्षय हा लातूर येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यामुळे तो लातूर येथेच भाड्याची खोली घेऊन राहतो. अक्षय याचे सहा महिन्यांपूर्वी परभणी येथील प्रतीक्षा नावाच्या मुलीसोबत थाटामाटात लग्न झाले होते. त्यामुळे अक्षयची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या दोघी जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात भाड्याच्या खोलीत राहत होत्या. मध्यरात्री किंवा बुधवारी पहाटेच्या सुमारास सविता यांचा खून झाला. खुनानंतर संशयित आरोपी सुनेने मृतदेह सिमेंटच्या गोणीत भरून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु वजन जास्त असल्याने तिला गोणी उचलता आली नाही, ही गोणी जिन्यात अडकल्याने घरमालकाने पाहून तिला सहज हटकले असता, तिने मृतदेह असलेली गोणी पायऱ्याजवळ तशीच ठेवली. साथीदाराला फोन करून बोलावून घेतले.

त्यानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी हेदेखील घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर महिलेचा भिंतीवर डोके आपटून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात संशयित सुनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून यासंदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक भारती यांनी सांगितले.

बाजार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन ते तीन तासांत सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य चौकशीच्या माध्यमातून आरोपी महिलेचा माग काढून तिला परभणी येथे पकडून जेरबंद केले आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली.
सीसीटीव्ही फुटेज हस्तगत
भोकरदन नाका भागात मुख्य रस्त्यावरच मालुसरे यांचे घर असून हा रस्ता वर्दळीचा आहे. त्यामुळे खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी दोघी राहत असलेल्या इमारतीचे तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरून खून केल्यानंतर पहाटे ५.२८ वाजता संशयित प्रतीक्षा ही बाहेर पडताना दिसली. सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला मोठी मदत मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.







