जालना: जालना (Crime News) शहरात रविवारी पहाटेच्या वेळी एक थरारक प्रकार उघडकीस आला असून एका तरुणाने कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पिटलच्या समोर घडली. मयत तरुणाचे नाव सागर श्रीराम धानोरे (35 वर्षे) असून ते भवानी नगर भागातील रहिवासी होते. सागर हे शनिवारी रात्रीपासून घरी परतले नव्हते, त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह गाडीत आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले असून याच शस्त्रातून उजव्या कानावर गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.
सागर धानोरे हे व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होते आणि जालना जिल्ह्यातील मोठे राजकीय व्यक्तिमत्व, काँग्रेस नेते डॉ. पंडितराव धानोरे यांचे ते पुतणे होते. मात्र सागर यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. पोलीस तपासात असे आढळले की, गोळी डोक्याच्या एका बाजूने घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली होती, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कोणालाही समजलेले नाही. त्यांच्याकडे हे शस्त्र कोठून आले आणि त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध जालना पोलीस घेत आहेत.







