Crime News: छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशा वेळी छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर परिसरात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका परीक्षा केंद्रावर ड्युटीवर असलेल्या शिक्षकाने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीशी अश्लिल वर्तन (Obscene behavior with a student) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक परीक्षा केंद्रावर देखरेखीच्या कामासाठी नियुक्त होता. परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी त्याने अयोग्य संवाद साधला आणि तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्या शिक्षकाने विद्यार्थिनीला वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप आहे. सततच्या संपर्कामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावात गेल्याचे समजते. अखेर तिने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.
संतप्त नातेवाईकांचा शिक्षकाला चोप
घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनीचे नातेवाईक परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या उपस्थितीत संबंधित शिक्षकाला जाब विचारला. या वेळी शिक्षकाने आपली चूक मान्य केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी त्याला मारहाण केल्याचीही चर्चा आहे. या शिक्षकाने इतर विद्यार्थिनींनाही त्रास दिला असावा का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने संबंधित शिक्षकावर तातडीने कारवाई केली आहे. त्याला पदावरून निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






