लातूर: लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे (Latur News) पुन्हा एकदा समोर आले आहे. चाकूर तालुक्यातील नायगाव परिसरात (Latur Crime) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे. उमरगा रोडवरील बी.एन. बार अॅण्ड रेस्टॉरन्टचे मालक गजानन नामदेव कासले (वय 42) यांची अज्ञात तिघांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून हत्या केली आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली असून या हत्याकांडामुळे उमरगा आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिघे अज्ञात इसम मद्यधुंद अवस्थेत बारमध्ये आले होते. त्यांनी सिगरेट मागितली असता ती न दिल्याने वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर तिघांनी गजानन कासले यांच्यावर लाकडी काठीने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर 15 पेक्षा अधिक वेळा काठीने वार केले. कासले जमिनीवर कोसळल्यानंतरही हल्ला थांबवण्यात आला नाही. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचा संपूर्ण प्रकार बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये दोन आरोपी काठी घेऊन हॉटेलच्या मॅनेजरच्या खोलीत जाताना दिसतात. तेथे गल्ल्यातील ड्रॉवर उघडून रोख रक्कम काढून खिशात टाकताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी रात्री सुमारे 11.50 वाजले होते. त्यामुळे ही हत्या केवळ वादातून न होता दरोड्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या हल्ल्यात बारमधील कर्मचारी अजय भरत मोरे (रा. अजनी, ता. अहमदपूर) हेही जखमी झाले आहेत. तिघे आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळी आले होते, हेही सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृत गजानन कासले यांचे नातेवाईक बालाजी नामदेव कासले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध जबरी चोरी करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दरोड्यासाठीच घडली का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.







