पुणे : पुणे महानगरपालिकेतील बनावट नोकरभरती प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी धडक कारवाई करत जेजुरी देवस्थानचे माजी विश्ववस्त आणि मुख्य सूत्रधार डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर याला अटक केली आहे. 29 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी पोलिसांनी या घोटाळ्याशी संबंधित सात जणांना आधीच ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी मार्च 2022 ते जुलै 2026 या काळात राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. पुणे महापालिकेत विविध पदांवर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी शेकडो तरुणांकडून कोट्यवधी रुपये उकळले. विश्वास बसावा यासाठी महापालिकेच्या नावाचे बनावट शिक्के, खोटी नियुक्तीपत्रे आणि हुबेहूब दिसणारी सरकारी कागदपत्रे तयार करून तरुणांची दिशाभूल करण्यात आली होती.

राजेंद्र खेडेकर हा जेजुरी देवस्थानचा माजी विश्वस्त आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी 19 जुलै रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खेडेकर आणि महापालिकेच्या शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच जेजुरी देवस्थान ट्रस्टने खेडेकरची विश्वस्त पदावरून हकालपट्टी केली होती.

पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी खेडेकरने पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अखेर पोलिसांनी शोध घेऊन या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत






