मुंबई: सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा नरमाई पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीनंतर आता मौल्यवान धातूंच्या किमती सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्या आहेत. आज 30 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची घट झाली आहे.

मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,48,790 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1,36,790 रुपये मोजावे लागत आहेत. 18 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,11,590 रुपये इतका आहे. मागील तीन दिवसांतील घसरण पाहता एका दिवसाच्या स्थिरतेनंतर सोन्याच्या दरात पुन्हा दबाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. चांदीच्या किमतीतही आज घट झाली आहे. 1 किलो चांदीचा भाव 100 रुपयांनी कमी होऊन 2,39,900 रुपयांवर आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. पश्चिम आशियातील तणाव, अमेरिकन डॉलरची स्थिती आणि बाँड यील्डमधील बदल यामुळे गुंतवणूकदारांच्या निर्णयांवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील व्याजदरासंदर्भातील संकेतांकडेही बाजाराचे लक्ष आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तेल महाग झाल्यास महागाई वाढण्याची शक्यता असते.







