Maharashtra: मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी 2026–27 च्या अर्थसंकल्पात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ विकासाशी संबंधित योजना जाहीर केल्या. यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यापासून ते मोठ्या शहरांतील मेट्रो आणि महामार्ग प्रकल्पांपर्यंत विविध उपक्रमांचा समावेश आहे.

राज्यातील 1 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना मजबूत काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. यासाठी अंदाजे 4,500 कोटी रुपयांचा निधी राखण्यात आला असून आशियाई विकास बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ करणे, शेतमाल वाहतूक करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पुणे आणि लोणावळा दरम्यान वाढत्या रेल्वे वाहतुकीसाठी तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला गेला असून यासाठी 5,100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे परिसराला मोठा फायदा होणार आहे.
पुणे महानगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आहे. हडपसर ते लोणी काळभोर, सासवड रोड, रामवाडी ते वाघोली तसेच येरवडा ते कात्रज आणि हिन्जवडी ते सिंहगड रोड या मार्गिकांसाठी काम सुरू आहे.
शक्तिपीठ महामार्ग पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग), कल्याण ते लातूर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग, पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तसेच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर 192 किलोमीटर महामार्ग या प्रकल्पांसाठीही मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होईल.







