पुणे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (IAS Officer Transfer) निवडणुका जवळ आल्या असतानाच, राज्य सरकारने आज (१८ नोव्हेंबर) पाच सनदी (Pune News) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये दहावी आणि बारावी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्णी यांना इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते सध्या पुण्यातील ‘यशदा’ या सनदी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थेत उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासोबतच राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर आणि अंजली रमेश या चार आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

या बदल्यांनुसार, राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश खपले, जे छत्रपती संभाजी नगर येथील मृदा आणि जलसंधारण आयुक्त होते, त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. डॉ. मंजिरी मानोलकर, ज्या महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक होत्या, त्यांना आता पुणे येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्तपद देण्यात आले आहे. तसेच, हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अंजली रमेश यांची छत्रपती संभाजी नगर येथे आयुक्त, मृदा आणि जलसंधारण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.







