दुबई: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून देशभरात चर्चा सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. त्यामुळे अनेकांनी हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेचा कडाडून विरोध
या सामन्यावरून महाराष्ट्रात राजकीय वादही पेटला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या सामन्याला जोरदार विरोध केला आहे. काल पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे म्हणजे शहीदांचा अपमान आहे’. आज शिवसेनेकडून ‘माझं कुंकू माझा देश’ हे आंदोलनही केले जाणार आहे. कोल्हापुरात तर शिवसेनेने हॉटेल मालकांना हा सामना हॉटेल्समध्ये न दाखवण्याची विनंती केली आहे, असे सांगत की, हेच खरे राष्ट्रप्रेम आहे.
खेळाडूंना ‘व्यावसायिक’ राहण्याचा सल्ला
वृत्तानुसार, केवळ बाहेरच नव्हे, तर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्येही या सामन्याबद्दल संभ्रम आहे. खेळाडूंनी प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambir) आणि स्टाफसोबत चर्चा केली. त्यावेळी, ‘व्यावसायिक राहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पाहा,’ असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी होणारी पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली आहे.
या समस्येवर तोडगा?
एकंदरीत, भारत-पाकिस्तान सामन्यावर राजकीय आणि खेळाडूंच्या स्तरावर संभ्रम कायम आहे. एकीकडे दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी संबंध न ठेवण्याची मागणी जोर धरत आहे, तर दुसरीकडे व्यावसायिकतेच्या नावाखाली खेळाडूंचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. क्रिकेटप्रेमी आणि राजकीय नेते यांच्यात सुरू असलेल्या या वादाचा परिणाम खेळाच्या निकालावरही होण्याची शक्यता आहे. या तणावाच्या परिस्थितीत हा सामना खेळला जाणार की नाही, याबाबत अजूनही पूर्ण स्पष्टता नाही.







