Under 19 Asia Cup 2025: भारतीय अंडर-19 संघाने अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला असून अखेरीस तो 20 षटकांचा ठेवण्यात आला होता. (Cricket Breaking)

नाणेफेक हरल्यानंतर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवले. सलामीवीर दुल्निथ सिगेरा फक्त 1 धाव करून बाद झाला, तर विरान चमुडिता 19 धावा करून माघारी परतला. कविजा गमागे रनआऊट झाला. अवघ्या 28 धावांत 3 विकेट्स पडल्याने श्रीलंकेची सुरुवात अडचणीत सापडली.
यानंतर कर्णधार विमत दिनसागे आणि चामिका हीनातिगाला यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिनसागेने 34 धावा केल्या, मात्र दुसऱ्या बाजूने विकेट्स पडतच राहिल्या. श्रीलंकेचे 84 धावांत 6 फलंदाज बाद झाले. सातव्या विकेटसाठी हीनातिगाला आणि सेनेविरत्ने यांनी 52 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. हीनातिगालाने सर्वाधिक 42 धावा केल्या. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 138 धावा केल्या.
139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात मात्र खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे 7 धावांवर, तर वैभव सूर्यवंशी 9 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर विहान मल्होत्रा आणि आरोन जॉर्ज यांनी संयमी आणि आक्रमक खेळ करत सामन्याचा रंग बदलला. विहान मल्होत्राने 35 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत 45 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावा केल्या. आरोन जॉर्जनेही 44 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत 49 चेंडूंमध्ये नाबाद 58 धावा केल्या. 18व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत जॉर्जने भारताचा विजय निश्चित केला. अलीकडेच आयपीएल मिनी लिलावात आरसीबीकडून निवड झालेल्या विहान मल्होत्राच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केल्याने आता अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना अत्यंत रंगतदार अंतिम सामना पाहायला मिळणार आहे.






