Pune News : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जयस्वाल याच्या प्रकृतीबाबत एक अतिशय चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने खेळत असताना जयस्वालला अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई आणि राजस्थान यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यादरम्यान जयस्वालला पोटात असह्य वेदना होऊ लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सुरुवातीला हा सामान्य त्रास वाटत असला तरी, वैद्यकीय अहवालात त्याला ‘गॅस्ट्रोएन्टेरिटिस’ म्हणजेच पोट आणि आतड्यांची तीव्र जळजळ झाल्याचा खळबळजनक खुलासा झाला असून यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. (Pune News)

या आजारपणाचा यशस्वीच्या प्रकृतीवर अत्यंत गंभीर परिणाम झाला असून, अवघ्या दोन दिवसांत त्याचे वजन दोन किलोपेक्षा जास्त घटल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो मुंबईला परतला असला तरी त्याची शारीरिक शक्ती प्रचंड कमी झाली आहे. डॉक्टरांनी त्याला पुढील ७ ते १० दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिला आहे. पुण्याच्या एका हॉटेलमध्ये केलेल्या जेवणातून हा विषबाधेचा प्रकार घडल्याचे प्राथमिक सूत्रांकडून सांगितले जात आहे. सध्या त्याला कठोर आहार आणि औषधोपचारांवर ठेवण्यात आले असून, बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
यशस्वी जयस्वालच्या या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या रणनितीला मोठा फटका बसला आहे. २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना तो मुकण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत रोहित शर्मा आणि जयस्वाल ही जोडी सलामीला येणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती, मात्र आता त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय, जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी जयस्वाल पूर्णपणे फिट होणे टीम इंडियासाठी महत्त्वाचे आहे. जयस्वालला पूर्णपणे मैदानात परतण्यासाठी किमान एक आठवडा लागणार असून, त्याचे वजन आणि ताकद पूर्ववत करणे हे सध्या वैद्यकीय टीमसमोरील मोठे आव्हान आहे.






