उत्तर प्रदेश: गाझियाबादच्या ओरा काइमेरा (Crime News) सोसायटीत भाड्याच्या पैशांवरून एका महिलेचा बळी गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अजय आणि आकृती गुप्ता या दांपत्याने सुमारे 90 हजार रुपयांचे घरभाडे थकवले होते. मागील 8 महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या या भाडेकरूंनी गेल्या 6 महिन्यांपासून एकही रुपया दिला नव्हता. यामुळे मालकीण दीपशिखा शर्मा यांच्यासोबत त्यांचे नेहमीच खटके उडत होते. पैशांच्या याच तणावातून या जोडप्याने टोकाचे पाऊल उचलत घरमालकिणीचा कायमचा काटा काढण्याचे कारस्थान रचले.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री दीपशिखा या भाड्याचे पैसे घेण्यासाठी या दांपत्याच्या घरी गेल्या होत्या. मात्र, तिथे गेल्यावर पती-पत्नीने दीपशिखा यांचा गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे, खुनानंतर या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत क्रूर मार्ग अवलंबला. त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून ते एका शॉपिंग ट्रॉली बॅगेत भरले आणि ती बॅग बेडच्या आत लपवून ठेवली. आणि त्या पलंगावर झोपले. रात्री उशिरापर्यंत दीपशिखा घरी न परतल्याने त्यांच्या पतीने शोध सुरू केला. सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्या आरोपींच्या घरात जाताना दिसल्या, पण तिथून बाहेर आल्याचे कुठेही दिसत नव्हते.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी घराची झडती घेतली असता हा थरार उघड झाला. पोलिसांनी तात्काळ या पती-पत्नीला अटक करून जेरबंद केले आहे. किरकोळ पैशांच्या वादातून झालेल्या या क्रूर हत्येमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.






