Ind vs Sa 5th T20: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2025 वर्षाचा शेवट दणक्यात केला. अहमदाबादमध्ये झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या टी20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-1 अशी आपल्या नावावर केली. मालिकेतील या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघात आनंदाचे वातावरण होते.

सामन्यानंतर झालेल्या विजयी समारंभात मात्र एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला. टीम इंडियामध्ये परंपरेनुसार मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी संघातील सर्वात युवा खेळाडू किंवा मालिकेत पदार्पण करणाऱ्या नवख्या खेळाडूकडे दिली जाते. मात्र यावेळी ही परंपरा मोडली गेली. कर्णधार सूर्यकुमार यादव याने ट्रॉफी थेट 31 वर्षीय शहबाज अहमद याच्याकडे सोपवली.
मॅचनंतर प्रेझेंटेशनदरम्यान ट्रॉफी हातात घेऊन संघाकडे जाताना सूर्यकुमार यादव क्षणभर गोंधळलेला दिसला. ट्रॉफी नेमकी कोणाला द्यायची, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याच वेळी शुभमन गिल याने सूर्यकुमारला शहबाज अहमदला ट्रॉफी देण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मान्य करत सूर्यकुमारने ट्रॉफी शहबाजकडे दिली. ट्रॉफी मिळताच शहबाज अहमद स्वतःही थक्क झालेला दिसला.
शहबाज अहमदची या मालिकेत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात एन्ट्री झाली होती. अक्षर पटेल जखमी झाल्यानंतर शहबाजला संघात संधी देण्यात आली होती. मात्र संपूर्ण मालिकेत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीही संघाने दाखवलेल्या विश्वासामुळे आणि मिळालेल्या सन्मानामुळे शहबाज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
शहबाज अहमदने आतापर्यंत भारतासाठी 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. 2023 मध्ये त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या खास क्षणाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून चाहत्यांकडून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.






