IND vs SA 5th T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि निर्णायक टी-20 सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-1 ने आपल्या नावावर केली. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा विजय भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी झंझावाती सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 34 धावा केल्या, तर संजू सॅमसनने 22 चेंडूत 37 धावांची खेळी केली. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि तो केवळ 5 धावांवर बाद झाला.
यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी सामन्याचे चित्रच बदलून टाकले. दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत चौथ्या विकेटसाठी 44 चेंडूत 105 धावांची तुफानी भागीदारी केली. हार्दिक पांड्याने केवळ 25 चेंडूत 63 धावा केल्या, तर तिलक वर्माने 42 चेंडूत 73 धावांची जबरदस्त खेळी साकारली. तिलक अखेरच्या षटकात रनआउट झाला. शिवम दुबे 10 धावांवर नाबाद राहिला. भारताने 20 षटकांत 5 विकेट्स गमावून 232 धावांचा मोठा स्कोअर उभा केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे गडगडला. वरुण चक्रवर्तीच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज टिकू शकले नाहीत. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह भारताने मालिका जिंकली असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी संघ योग्य दिशेने जात असल्याचे चित्र दिसत आहे.







