पुणे: पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या (Pune Traffic) समस्येची दखल घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यांनी वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंढवा-केशवनगर (Keshavnagar) परिसरातील चौकाची अचानक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारीही होते.

दरम्यान, एका महिलेने अजित पवारांना (Ajit Pawar) थेट सल्ला दिला. “मनोहर पर्रीकर ज्याप्रमाणे अचानक ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे, त्याचप्रमाणे तुम्हीही कधीही न सांगता येऊन परिस्थिती पाहा,” असे एका महिलेने त्यांना सांगितले. त्यावर अजित पवारांनी “पर्रीकर कोण?” असा प्रश्न विचारला, ज्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला. महिलेने लगेचच ‘ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. असे सांगितले. महिला पुढे म्हणाली कि, केवळ चर्चेने नव्हे, तर प्रत्यक्ष पाहणीनेच समस्या कळेल.
वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाचा नागरिकांनी पाढा वाचला, अजित पवारांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच, अजित पवार यांनी आपली चूक मान्य करत म्हटले, “आमची चूक झाली, आम्ही ती मान्य करतो आणि म्हणूनच यावर उपाय शोधण्यासाठी आलो आहे. तुम्हाला जो त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.”
या पाहणीनंतर अजित पवारांनी वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांनी सिग्नल यंत्रणा तातडीने व्यवस्थित करण्याचे आदेश दिले.







