पुणे: पुणे महानगरपालिका लवकरच ‘ट्री क्लीनिक व्हॅन’ सेवा सुरू करत आहे. शहरातील झाडांची निगा राखण्यासाठी आणि हरित पट्टा जपण्यासाठी ही अभिनव सेवा राबवण्यात येत आहे. चेन्नई महापालिकेच्या यशस्वी उपक्रमावर आधारित असलेली ही योजना झाडांचे आरोग्य जपण्यासाठी आणि पर्यावरणपूरक प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.

पुणे महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी सांगितले की, “शहरातील हरित पट्टा टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाहन झाडांच्या देखभालीसाठी विविध भागात जाईल. नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठीपुणे महानारपालिकेशी संपर्क साधावा. झाडांवर अवैध जाहिराती लावून त्यांचे नुकसान करणाऱ्या प्रकारांविषयी जनजागृती करणे हाही या उपक्रमाचा उद्देश आहे.”
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांना कुठे झाडे जखमी अवस्थेत आहेत, याची माहिती पुणे महानगरपालिकेला देण्याची मुभा असेल. तसेच, इच्छुक नागरिक स्वयंसेवक म्हणून ‘ट्री क्लीनिक व्हॅन’ सेवा प्रचारासाठी आणि जनजागृतीसाठी सहभागी होऊ शकतात.या सेवेअंतर्गत एक सुसज्ज वाहन झाडांची छाटणी, औषध फवारणी, कीटकनाशक वापर, खत टाकणे, आणि अन्य झाडांच्या देखभालीची कामे करेल. प्रशिक्षित बागकाम तज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि कामगार या सेवेचा भाग असतील.
याशिवाय, महाराष्ट्राच्या शहरी भागात झाडांचे संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ नुसार झाडांची फोड, नुकसान किंवा नष्ट करणे हे दंडनीय आहे. या कायद्याअंतर्गत शहरी भागांतील झाडांची छाटणी, तोड व संवर्धन याचे नियंत्रण ठेवले जाते. कोणतेही झाड तोडण्यापूर्वी ‘ट्री प्राधिकरणा’ कडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.पुणे महानगरपालिकेचा हा उपक्रम केवळ झाडांचे संरक्षण करण्यापुरता मर्यादित नसून, शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबतची जागरूकता निर्माण करण्यासाठीही उपयुक्त ठरेल. ‘ग्रीन पुणे’ या दिशेने हे एक सकारात्मक आणि काळाची गरज असलेले पाऊल आहे.







