गणेश सुळ

केडगाव : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलिसअधिकारी बापूराव दडस यांना देण्यात आले आहे.
पत्रकारांवर हल्ला होणे हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर गंभीर प्रहार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाजातील घडामोडी सत्य जनतेसमोर मांडण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होणे हे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनात पत्रकारांची प्रमुख मागणी अशा आहेत की, ‘हल्लेखोरांवर ‘मकोका’सह कठोर कायद्यांतर्गत कारवाई करावी. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी. संबंधित घटनेचा तपास जलदगतीने करून आरोपींना तातडीने अटक करावी. भविष्यात पत्रकारांवर असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पत्रकारांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असून पत्रकारांचे जीवित धोक्यात घालणाऱ्या घटनांबाबत जबाबदार व्यक्तींवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या वेळी दौंड येथील राजू जगदाळे,उमेश कुलकर्णी, नरेंद्र जगताप, सुमित सोनवणे, सचिन आव्हाड, अख्तर काझी, गणेश सूळ, अलीम सय्यद, पवन साळवे , संतोष जाधव , वाजीद बागवान, अमर परदेशी, मिलिंद शेंडगे, सदाशिव रणदिवे, दीपक सोनवणे यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते.







