Solapur News: सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चिंचोली परिसरात किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये वाद वाढत गेला आणि त्याचे रूप मारहाणीत झाले. या घटनेत सुमारे 8 ते 10 जण जखमी झाले असून काही महिलांचाही यात समावेश आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये आधी किरकोळ वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या मारहाणीत काहींच्या डोक्याला दुखापत झाली असून अनेकांना गंभीर मार लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी मोरे यांचे पती मुन्ना मोरे यांच्यासह बावी गावातील चार जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटानेही पोलिसांकडे परस्पर विरोधी तक्रार दिली असून दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.







