अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील नाथ नगर वस्ती, काळुबाई मंदिराजवळ कौटुंबिक वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा (Shirur Crime) दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किशोरी विशाल लंघे (वय 38, व्यवसाय शेतमजुरी, रा. नाथ नगर वस्ती, काळुबाई मंदिराजवळ, सविंदणे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती विशाल उर्फ गणेश नामदेव लंघे व जया राजेंद्र पोखरकर (रा. सविंदणे) या दोघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता फिर्यादी आपल्या घरी असताना त्यांची मुलगी विशाखाने त्यांना आरोपी जया पोखरकर हिने बोलावल्याचे सांगितले. त्यानंतर त्या पोखरकर यांच्या घरासमोर गेल्यावर आरोपी जया हिने त्यांच्यावर चावा घेतला व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आरोपी पती विशाल लंघे यांनी काठीने हातावर व डोक्यात मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीमुळे जखमी झालेल्या किशोरी विशाल लंघे यांना प्रथम शिरूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल, पुणे येथे हलविण्यात आले होते.
या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल उबाळे हे करत आहेत.







