Pune : पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे. मांडवगण फराटा,तळेगाव ढमढेरे, वडगाव रासाई,इनामगाव,निर्वी, बाभुळसर बुद्रुक व तांदळी या प्रमुख गावांतील अनेक ग्रामस्थांची नावे थेट पुणे महानगरपालिकेच्या मतदारयादीत समाविष्ट असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune)

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मांडवगण फराटा व परिसरात अज्ञात व्यक्तींकडून ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले असून, दुबार मतदान केल्यास किंवा त्यासाठी वाघोली येथे गेल्यास “मजबूत चोप देऊन पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागेल”, असा थेट आणि सज्जड इशारा देण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या फ्लेक्सबाजीमुळे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावागावांत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, मांडवगण फराटा ग्रामपंचायत हद्दीतील अनेक मतदारांची नावे ग्रामपंचायत मतदारयादीत असतानाच वाघोली (पुणे महानगरपालिका) प्रभागाच्या मतदारयादीतही नोंद असल्याचा दावा या फ्लेक्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर नावे असल्याचे बोलले जात असताना फ्लेक्सवर केवळ 25 मतदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आल्याने उर्वरित मतदारांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांतील मतदार प्रत्यक्षात ग्रामीण भागात वास्तव्यास असताना किंवा त्यांचा वाघोलीशी कोणताही संबंध नसताना त्यांच्या नावांची नोंद महापालिकेच्या वाघोली प्रभागातील यादीत असल्याचे आढळून आल्याने नागरिकांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. मोठ्या संख्येने नावे असतानाही मोजक्याच लोकांची नावे जाहीर करून फ्लेक्स लावण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमासोबतच संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या सर्व गावांच्या मुख्य चौकात अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली असून, दुबार मतदान हा गंभीर व कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे फ्लेक्सवर ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारात कोणीही सहभागी झाल्यास थेट पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कायद्याचे पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे गावागावांत चर्चेला उधाण आले असून, पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रशासन व निवडणूक यंत्रणेने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संतप्त झालेल्या काही नागरिकांनी हे फ्लेक्स ठिकठिकाणी फाडून टाकल्याच्याही घटना घडल्याने परिस्थिती आणखी संवेदनशील बनली आहे.







