Pune : पुण्यात रोजची वाहतूककोंडी आता पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. सकाळ-संध्याकाळ रस्त्यांवर अडकणं, वेळ वाया जाणं आणि पेट्रोल-डिझेलचा खर्च वाढणं हे रोजचंच झालंय. पण आता या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे.

राज्य सरकार पुण्यात भूगर्भीय वाहतूक प्रकल्प राबवणार असून, येरवडा ते कात्रज असा भलामोठा बोगदा तयार केला जाणार आहे. हा फक्त एक बोगदा नसेल, तर पुण्याच्या उत्तर-दक्षिण भागाला जोडणारं तब्बल 54 किलोमीटरचं भूमिगत जाळं असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच माहिती दिली की, पुण्यात एकूण 56 बोगदे बांधण्यात येणार आहेत. यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा आणि ऐतिहासिक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भूमिगत मार्गामध्ये जगताप डेअरी, सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी, खडकी अशा महत्त्वाच्या भागांचा समावेश असेल. यामुळे सध्या रस्त्यांवर असलेला ताण कमी होईल आणि रिंगरोडला जोडल्यामुळे महामार्गाकडे जाणारी वाहतूकही अधिक सोपी होणार आहे.
अजित पवार म्हणाले की, “पुण्यातील 32 मुख्य रस्त्यांवर क्षमतेपेक्षा दीड ते अडीचपट जास्त वाहतूक आहे. हे बोगदे सुरू झाले की ट्रॅफिक मोकळं होईल, लोकांचा वेळ वाचेल आणि इंधनाचाही अपव्यय कमी होईल.”
इतकंच नाही, तर शहरात 23 उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्यापैकी 8 कामं सध्या सुरू आहेत. काही ठिकाणी एलिव्हेटेड कॉरिडॉरही उभारले जाणार आहेत, ज्यामध्ये खाली सामान्य रस्ता आणि वर मेट्रो किंवा वेगळी वाहतूक व्यवस्था असेल.
या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च अंदाजे 32 हजार कोटी रुपये असून, त्यासाठी राज्य सरकार निधी देणार आहे. प्रकल्पाचं प्राथमिक डिझाइन आणि अहवाल तयार झाला असून, मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याला मंजुरी मिळाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, रिंगरोड आणि भूमिगत बोगदे पूर्ण झाले की पुण्यातली जवळपास 40 टक्के वाहतूककोंडी कमी होईल. याचा फायदा केवळ वाहनचालकांनाच नाही, तर शहरातील प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल.
एकूणच, हा प्रकल्प पुणेकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे. कात्रज घाटातील कोंडीला शेवटचा रामराम मिळेल आणि पुण्याची वाहतूक अधिक सुरळीत होईल. हे सगळं पूर्ण झालं, की पुणे आधुनिक वाहतूक व्यवस्थेचं एक आदर्श शहर म्हणून ओळखलं जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







