Pune : पुण्यात चंद्रग्रहणाच्या दिवशी अंधश्रद्धांना थेट आव्हान देणारा एक वेगळा आणि ठोस उपक्रम पाहायला मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने ‘सोडा अंधश्रद्धेचं ग्रहण’ हा कार्यक्रम राबवण्यात आला. उद्देश एकच ग्रहणाशी जोडल्या गेलेल्या भीती, गैरसमज आणि विशेषतः गरोदर महिलांवर लादल्या जाणाऱ्या निर्बंधांना वैज्ञानिक पद्धतीने फेटाळणे.

आजही अनेक घरांमध्ये ग्रहण लागले की “भाजी चिरू नको”, “कात्री वापरू नको”, “काही खाऊ नको” असे नियम पाळले जातात. ग्रहणात भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात, अशी भीती विशेषतः गर्भवती महिलांच्या मनात पेरली जाते. पण पुण्यातील नांदेड सिटी, सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी या समजुतीला प्रत्यक्ष कृतीतून छेद दिला.
चंद्रग्रहण सुरू होताच त्या स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी भाज्या चिरल्या, कात्रीने कागद कापला आणि कोणतीही भीती न बाळगता जेवणही केले. या कृतीतून त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान महत्त्वाचे. “माझ्या बाळावर भीतीचे नाही, तर वैज्ञानिक विचारांचे संस्कार व्हावेत, म्हणून मी हे केलं,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.
या उपक्रमाला वैद्यकीय पाठबळही मिळाले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय निटवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बाळाचे ओठ फाटणे (क्लेफ्ट लिप) हे जनुकीय कारणांमुळे किंवा गर्भावस्थेतील पोषणाच्या कमतरतेमुळे होऊ शकते. त्याचा चंद्रग्रहणाशी किंवा कोणत्याही खगोलीय घटनेशी काहीही संबंध नाही.
चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. तरीही राहू-केतू, अन्न दुषित होणे, गर्भवती महिलांना धोका अशा अनेक समजुती समाजात खोलवर रुजल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, पुण्यात झालेला हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक नव्हता, तर समाजाला विचार करायला लावणारा होता.
अंधश्रद्धा प्रश्न न विचारता पाळण्याऐवजी वैज्ञानिक माहिती समजून घेणे, हा संदेश या उपक्रमातून ठळकपणे पुढे आला आणि तोच या कार्यक्रमाचा खरा अर्थ ठरला.







