Pune Politics : महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असून, यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. या संभाव्य एकत्रिकरणाला मात्र पुण्यातील शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट विरोध दर्शवला होता. अजित पवारांसोबत जाणं म्हणजे थेट भाजपसोबत जाण्यासारखं असल्याचं सांगत, त्यांनी विचारधारा आणि नैतिकतेचं कारण पुढे करत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Pune Politics)

या राजीनाम्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडण्यामागे अत्यंत महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र ते कारण सध्या उघड करणार नसल्याचं स्पष्ट केलं. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, प्रशांत जगताप हे सक्षम आणि काम करणारे पदाधिकारी होते. त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला, यामागची कारणं मोठी असून त्यावर सध्या बोलणं योग्य ठरणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
रोहित पवार पुढे म्हणाले की, प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी ज्या कार्यकर्त्यांची नावं घेतली होती, त्यापैकी जवळपास ९५ टक्के कार्यकर्ते खासदार सुप्रिया सुळेंना भेटले. या भेटीत कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत घड्याळ चिन्हासोबतच राहण्याची भूमिका मांडली. त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची असल्याने त्यांचं मत विचारात घेऊनच पुढचा निर्णय घेण्यात आल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, टीव्हीवर दोन पवार एकत्र येत असल्याचं चित्र दाखवलं जात असलं, तरी शरद पवार गटाचे आणि घड्याळ चिन्हाचे कार्यकर्ते यांच्यासाठी ही निवडणूक पारदर्शक आणि योग्य पद्धतीने व्हावी, महापालिकेत बलाढ्य शक्तींशी सामना करणं सोपं व्हावं, यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.







