Pune News : पुणे रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या चार विशेष रेल्वे गाड्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या गाड्यांचा कालावधी आता फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. (Pune News)

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने काही मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. मात्र, या गाड्यांचा कालावधी डिसेंबरअखेर संपणार होता. आता नवीन वर्षातही या गाड्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, या गाड्यांचे मार्ग, वेळापत्रक, थांबे आणि डबे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व काही पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
दरम्यान, पुणे-कोल्हापूर आणि पुणे-लातूर या विशेष गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरीही या गाड्या अजून विशेष स्वरूपातच चालवल्या जात आहेत. त्यामुळे या गाड्या कायमस्वरूपी म्हणजेच नियमित कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कालावधी वाढवलेल्या विशेष गाड्या
-
गाडी क्रमांक ०१४६१/६२ सोलापूर-दौंड-सोलापूर (अनारक्षित)
दररोज धावणाऱ्या या गाडीचा कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. -
गाडी क्रमांक ०१०२३/०१०२४ पुणे-कोल्हापूर-पुणे
या दररोजच्या विशेष गाडीचा कालावधी ३१ डिसेंबरला संपणार होता. आता तोही २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. -
गाडी क्रमांक ०१४८७/०१४८८ पुणे-हरंगुळ (लातूर)-पुणे
ही विशेष गाडी दररोज धावते असून तिचा कालावधी २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. -
हडपसर-हरंगुळ (लातूर)-हडपसर विशेष गाडी
हीच गाडी आता २७ जानेवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत हडपसर येथून धावणार आहे.
इतर मार्गांवरही विशेष गाड्यांची सोय
वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने देशभरातील मुख्य ८ मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. एकूण २४४ विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, आणखी काही अतिरिक्त गाड्या येत्या काळात सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर ७६ विशेष गाड्या, तर पश्चिम रेल्वेवर ७२ विशेष गाड्या धावणार असल्यामुळे मुंबई आणि पुणे परिसरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.






