इंदापूर आदित्य बोराटे –

Pune News : नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करावे, अशी मागणी नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नूतन नगराध्यक्ष भरत शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनानुसार, इंदापूर नगर परिषदेतील अनेक कर्मचारी गेल्या पंधरा वर्षांपासून नगरपरिषदेत कंत्राटी पद्धतीवर प्रामाणिकपणे काम करत असून, शहराच्या स्वच्छतेसह विविध नागरी सेवा सुरळीत ठेवण्यात योगदान देत आहेत. यासह इंदापूर नगरपरिषदेला स्वच्छतेबाबत देशपातळीवर मिळालेल्या विविध पुरस्कारांमध्ये या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. असे असताना सध्या वाढत्या महागाईमुळे कंत्राटी पद्धतीने मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण होत आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे. नगरपरिषदेमध्ये कायम सेवेत संधी दिल्यास पुढील काळात अधिक जोमाने व अखंडित सेवा देण्याची तयारी असल्याचे कर्मचाऱ्यांनी या निवेदनामध्ये नमूद करीत या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती कर्मचाऱ्यांच्या वतीने केली आहे. दरम्यान या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, तसेच इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनाही
पाठवली आहे.







