पुणे: पुणे महानगर पालिकेचे नवे आयुक्त नवल किशोर राम यांनी आज (दि.२) पदभार स्वीकारला. ३१ मे रोजी विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या सेवानिवृत्तीनंतर, नवल किशोर राम यांनी पुणे पालिकेच्या कारभाराची जबाबदारी घेतली आहे. आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, त्यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या आगामी योजनांविषयी माहिती दिली.

“शहराच्या विकासासाठी काम करू”
पदभार स्वीकारल्यानंतर नवल किशोर राम म्हणाले, “माझ्या स्वतःच्या अजेंड्याऐवजी, शहरातील लोकांचे जे अजेंडा आहेत, त्यावर काम करणे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे. पुण्यातील अडीच वर्षे कलेक्टर म्हणून काम करत असताना मी शहराच्या समस्यांशी परिचित आहे. महापालिका प्रशासनाच्या कामकाजात अधिक शिस्त आणि पारदर्शकता आणणे, तसेच नागरिकांसाठी सेवा अधिक सुलभ बनवणे हे माझ्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये आहे.”
“प्रशासकीय यंत्रणेत शिस्त आणणार”
नवल किशोर राम यांनी पुढे सांगितले की, “महापालिकेच्या प्रशासनात शिस्त आणणे आणि कामकाजात पारदर्शकता वाढविणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तसेच, नागरिकांच्या सेवांना अधिक सुलभ कसे बनवता येईल, यावर मी लक्ष देईल. पालिकेचे अनेक मोठे प्रकल्प पेंडिंग आहेत, त्यात मेट्रो प्रकल्प आणि मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प यांचा समावेश आहे. हे प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे आवश्यक आहे.”
“अतिक्रमणाचा आढावा घेणार”
पुण्यातील अतिक्रमणाच्या समस्येला पहिल्याच दिवशी आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्त्व दिले. त्यांनी सांगितले, “अतिक्रमण हा एक गंभीर प्रश्न आहे. यावर एक कार्य योजना तयार करू आणि अतिक्रमण हटवण्याचे काम पारदर्शकतेने आणि योग्य मार्गाने करू. अतिक्रमण काढण्याचा आमचा उद्देश लोकांना शहरातून हद्दपार करणे नाही, तर डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणेच काम होणे हे आहे.”
“निवडणुकीसाठी तयारी”
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताबा घेतला जाणार आहे. यावर नवल किशोर राम म्हणाले, “महानगरपालिका निवडणुका संदर्भात अद्याप शासनाचा आदेश आलेला नाही. तथापि, निवडणूका करण्याचा माझा अनुभव आहे, त्यामुळे जे काही पुढे येईल, ते आम्ही व्यवस्थित पाहून तयारी करू.”
नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेच्या प्रशासनात मोठे बदल आणि सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कामकाजाच्या योजनांमुळे पुणे शहराच्या विकासाला नवा दिशा मिळणार आहे.







