पुणे: राज्यातील नगर परिषद निवडणुकांचे (ZP Election) निकाल जाहीर झाल्यानंतर आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्यास आता आणखी काही काळाचा विलंब होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासकीय कारणांमुळे ही घोषणा आता नवीन वर्षात, म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे निवडणुकांची तयारी करणाऱ्या इच्छुकांना आता आणखी 15 ते 20 दिवस वाट पाहावी लागणार आहे.

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने उर्वरित 22 जिल्हा परिषदांबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय आल्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येण्यासाठी आता नवीन वर्षाचीच प्रतीक्षा करावी लागेल.
सध्याच्या नियोजनानुसार, 24 डिसेंबरपर्यंत या निवडणुकांचे बिगुल वाजेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, प्रशासकीय पातळीवरील काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया आता किमान दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात साधारण 15 जानेवारीच्या आसपास महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असले, तरी अद्याप जिल्हा परिषदेच्या तारखा निश्चित झालेल्या नाहीत. मतदान यंत्रांची उपलब्धता आणि निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती यांसारख्या बाबींमुळे या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे समजते.







