पुणे: इंग्रज सत्तेला थेट आव्हान देत संपूर्ण (Wafgaon Fort) हिंदुस्तानात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवणारे, पराक्रम, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेले महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा (Maharaja Yashwantrao Holkar) राज्याभिषेक दिन सोहळा मंगळवार, 6 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात (Khed News) असलेल्या ऐतिहासिक किल्ले वाफगाव येथे पारंपरिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. हा सोहळा होळकर घराण्याचे वंशज आणि राज्याभिषेक समितीचे प्रमुख भूषणसिंह राजे होळकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. (Latest Marathi News)

हा राज्याभिषेक दिन सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून स्वराज्याच्या इतिहासाला अभिवादन करणारा आणि होळकर घराण्याच्या पराक्रमाची आठवण करून देणारा महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भारतीय लष्करातील ज्येष्ठ अधिकारी, देशातील विविध ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी नागरिकही या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेण्यात होळकर घराण्याचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. वाफगाव हे होळकर घराण्याचे मूळगाव असून, सुभेदार मल्हारराव होळकर यांनी उभारलेला भुईकोट किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. विविध कालखंडात होळकर राजघराण्यातील सदस्य या किल्ल्यात वास्तव्यास होते.
आजही किल्ले वाफगावमध्ये इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू पाहायला मिळतात. भव्य प्रवेशद्वार, तटबंदी, राणी महाल, विष्णू पंचायतन, अंधारी विहीर, राजसदर, पश्चिम द्वार, भुयारी मार्ग आणि होळकरकालीन तोफा यामुळे हा किल्ला इतिहासप्रेमींना आकर्षित करतो.
सध्या किल्ले वाफगावच्या संवर्धनाचे काम सुरू असून, येत्या काळात हा किल्ला एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार आहे. त्यामुळे नव्या पिढीसाठी हा किल्ला प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 6 जानेवारी 2026 रोजी किल्ले वाफगाव येथे इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.







