लोणी काळभोर, ता. 24 : एकीकडे विश्वराज हॉस्पिटलकडून (Uruli Kanchan News) पैशासाठी अपघातात जखमी झालेल्या तरुणाला कथित अमानुष वागणूक मिळाल्याचा आरोप होत असतानाच, दुसरीकडे उरुळी कांचन पोलिसांनीही कुटुंबीयांना अपेक्षित सहकार्य न करता जुलमी न्याय दिल्याची बाब समोर येत आहे. पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर ती स्वीकारण्याऐवजी, “तुमच्या जखमी मुलावरच गुन्हा दाखल होईल,” अशी धमकी देत आम्हालाच माघारी पाठवण्यात आले, असा खळबळजनक आरोप जखमी तरुणाचे वडील योगेश चिकणे यांनी केला आहे.

या प्रकारामुळे उरुळी कांचन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठीच संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) 11 मार्च रोजी अपघात झाला होता. या अपघातात अनुराग योगेश चिकणे (वय 23, रा. भोसरे, ता. माढा) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याचा डावा हात अक्षरशः चिरडला गेला होता. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून हात कापण्यात आला. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगूनही रुग्णालय प्रशासनाने “50 हजार रुपये भरल्याशिवाय डिस्चार्ज नाही” असा कठोर पवित्रा घेतला. एवढेच नव्हे, तर पैसे जमा होईपर्यंत तब्बल 12 तास उपचार थांबवण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पैशासाठी रुग्णाचे उपचार रोखणे हा वैद्यकीय नैतिकतेचा सरळसरळ भंग असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, अपघाताची नोंद घेण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी एमएलसी केली; मात्र घटना उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तक्रार तेथे द्यावी, असे सांगण्यात आले. न्यायाच्या अपेक्षेने अनुरागचे नातेवाईक उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गेले, मात्र तेथे त्यांना सहानुभूतीऐवजी धाक आणि दडपशाहीचा सामना करावा लागला. “तुमच्या मुलाचीच चूक आहे… तुमच्यावरच गुन्हा दाखल करू का?” अशी उलट धमकी पोलिसांकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या वागणुकीमुळे घाबरून त्यांनी तक्रार नोंदविण्याचा प्रयत्नच सोडून दिला. अपघात होऊन 12 दिवस उलटूनही गुन्हा नोंदवला गेला नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची छाया पडली आहे.
एकीकडे पैशासाठी उपचार थांबवणारे हॉस्पिटल आणि दुसरीकडे जखमीच्यावर गुन्ह्याची तलवार लटकवणारे पोलीस, या दोन्ही यंत्रणांच्या कारभारामुळे सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, हा ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे. अपघातात अनुरागचा हात दंडापासून कापावा लागल्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. अशा स्थितीतही त्याच्या कुटुंबाला न्यायासाठी धावाधाव करावी लागत असल्याने प्रशासनाची संवेदनशीलता कुठे हरवली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल या घटनेकडे गांभीर्याने पाहणार का? आणि विश्वराज हॉस्पिटलच्या कारभाराची चौकशी होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सामान्य माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि न्याय नाकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही यंत्रणांवर कठोर कारवाई झाली नाही, तर नागरिकांचा विश्वास पूर्णपणे ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“उपचारादरम्यान आमच्या जखमी मुलाची झालेली हेळसांड आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकांविरोधात तक्रार देण्यासाठी गेल्यावर उरुळी कांचन पोलिसांनी दिलेली तुच्छ वागणूक ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आम्ही कबाडकष्ट करून मुलाला मोठं केलं. या अपघातामुळे आमच्यावर आधीच मोठं संकट कोसळलं आहे. त्यातच पोलिसांनी उलट ‘तुमच्यावरच गुन्हा दाखल करू’ अशी धमकी दिल्याने आम्ही घाबरून गावी परतलो. आता आम्हाला न्याय कोण देणार?”
योगेश चिकणे (अनुरागचे वडील)“जखमीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात कोणाला आणि कधी भेट घेतली, याची सध्या आम्ही माहिती घेत आहोत. तक्रारदारांनी थेट पोलीस ठाण्यात येऊन माझी भेट घ्यावी. त्यांच्या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.”
सचिन वांगडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस ठाणे)







