उरुळी कांचन, (पुणे): उरुळी कांचन (Uruli Kanchan News) ग्रामपंचायत समोरील एका दुकानाच्या बाहेर गुरुवारी (ता. 15) सकाळी भानामती आणि करणी-जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला. ग्रामपंचायत सचिवालयाच्या समोरच एका कापडी पिशवीत गुंडाळून ठेवलेले संशयास्पद साहित्य नागरिकांच्या निदर्शनास आले. विविध रंग लावलेली लिंबू, दोरे, सुया, काळ्या बाहुल्या अश्या वस्तू आढळून आल्या आहेत.

उरुळी कांचन येथे एकाच वेळी असे साहित्य आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेला तोंड फुटले आहे. काहीजणांनी या प्रकाराला अंधश्रद्धा पसरवून मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. उरुळी कांचन व परिसरात शहरात घटनांनी पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये संतापासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये व दुकानदरामध्ये संभ्रम निर्माण होऊन घबराहट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत सचिवालयात रोहित जाधव व विशाल जाधव हे दोघे भाऊ कामाला आहेत. सचिवालयाच्या बाहेरच त्यांचे मासे विक्रीचे दुकान आहे. ते त्यांची आई चालवते. बुधवारी रात्री दुकान बंद करून सर्वजण घरी गेले होते. यावेळी रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने दुकानाच्या बाहेर जादूटोण्याचा प्रकार केला.
सकाळी दुकानाच्या बाहेर एक बेवारस पिशवी आढळून आली. यामध्ये विविध रंग लावलेली लिंबू, दोरे, सुया, काळ्या बाहुल्या अश्या वस्तू आढळून आल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी प्रयत्न होत असताना या प्रकारामुळे समाजात आजही अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशा रूढींविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करणे आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली नसल्याची माहिती मिळाली आहे.





