Urali Kanchan : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव -पेठ रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन तरुणांनी टेम्पो, रिक्षा, व चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (ता. 18) रात्री घडली आहे.

या घटनेत वाहनांचे मालक चालक यांचे मोठया् प्रमाणात नुकसान झाले आहे. रिक्षा चालक, टेम्पो चालक, हे दिवसभर गाडी चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या वाहनांना अशा पद्धतीने तोडफोड केल्याने वाहन चालक मालक हळहळ व्यक्त करत आहेत. या घटनेबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव -पेठ रस्त्यावरून एक रिक्षाचालक हा सायंकाळी त्याच्या घरी निघाला होता. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी दहशत माजवत दगडाच्या सहाय्याने रिक्षाची काच फोडली. तसेच उरुळी कांचन येथील एका कंपनीचा टेम्पो हा कामानिमित्त परिसरात गेला होता. यावेळी समोरील काच या तिघांनी फोडली.
दरम्यान, या घटनेत टेम्पो चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एका टेम्पोचे दोन्ही आरसे फोडल्याची माहिती पेठ येथील एका नागरिकाने दिली आहे. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवणे गरजेचे आहे. अशी मागणीहि नागरिकांनी केली आहे.






