लोणी काळभोर, ता. 23: दुकानापासून लांब जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एकाने सासू सुनेशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (Theur Crime) (ता. हवेली) परिसरात रविवारी (ता.21) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर जयसिंग जाधव (वय 32, रा. जाधववस्ती, थेऊर ता. हवेली जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर फाटा ते कोलवडी रत्यावर फिर्यादी यांचे एक दुकान आहे. पिडीता या दुकानात काम करीत असताना, आरोपी अमर जाधव हा येथे आला. तो फोनवर कोणाला तरी मोठ्याने ओरडुन अश्लील शिवीगाळ करत होता, तेव्हा पिडीता यांनी त्यास दुकानापासून लांब जावून बोलण्यास सांगितले.
दरम्यान, दुकानापासून लांब जाऊन बोलण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन आरोपी अमर जाधव हा फिर्यादीला म्हणाला की तुला झोंबायला येवढे काय झाले. दलिंद्रे, तुला लई वाईट वाटतय तर तु इथे धंद्यावर कशाला बसली आहे? असे अश्लील बोलुन फिर्यादीचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न करुन फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच ही भांडणे पाहून पिडीत यांची सासू भांडणे सोडविण्यासाठी आली असता, आरोपीने त्यांनाही मारहाण केली. तसेच विनयभंग करून त्यांनाही ढकलून दिले.
याप्रकरणी पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर जाधव यांच्यावर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74, 79, 115 (2) 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.






