पुणे: पुणे शहरातील बाणेर (Pune Crime) आणि कोंढवा परिसरात सुरू असलेल्या (Pune News) वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. बाणेर येथील एका लॉजमध्ये तसेच कोंढव्यात एनआयबीएम रोडवरील स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Latest Breaking News)

पोलिसांना मिळाली टीप
बाणेर परिसरातील लक्ष्मणनगर येथील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकत तेथून काही तरुणींची सुटका केली. या कारवाईत लॉज व्यवस्थापक प्रकाश ज्ञानेश्वर गायकवाड (वय 24, सध्या रा. फलक इन लॉज, लक्ष्मणनगर, बाणेर) याला अटक करण्यात आली आहे. तसेच बाळू सुभाष चौधरी, अजितसिंग जितेंद्रपाल गाढोके आणि दलाल रोशन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई रोहित पाथरूट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीस प्रवृत्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्पाच्या आडून वेश्याव्यवसाय
दरम्यान, दुसरी कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एनआयबीएम रोड कोंढवा परिसरात केली. रॉयल हेरिटेज मॉलमधील ज्युवेनेक्स स्पा ब्युटी अँड वेलनेस येथे स्पाच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केल्यानंतर सोमवारी सायंकाळी सुमारे 5.15 वाजता छापा टाकण्यात आला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मॅनेजर ॲन्थोनी विल्सन स्वामी (वय 39) याला अटक करण्यात आली आहे. तसेच स्पा मालकीण निशा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटरमधून 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







