लोणी काळभोर: लोणी काळभोर-कदमवाकवस्ती-वडकी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल सुजित कांबळे, लोणी काळभोर-वडकी पंचायत समिती गणातून रेश्मा युवराज काळभोर, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून अमोल टेकाळे हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत सत्ता मिळवली, पण प्रत्यक्षात ‘गाव भकास आणि स्वतःचा विकास’ केला असल्याची जोरदार टीका माजी सरपंच नंदू काळभोर यांनी विरोधकांवर केली. तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

नंदू काळभोर म्हणाले की, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि वडकी या तिन्ही गावांतून राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांना महिला, युवक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उच्च शिक्षित आणि विकासाभिमुख उमेदवारांना जनता निश्चितच आशीर्वाद देईल. येत्या 7 तारखेला मतदारांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काळभोर यांनी सांगितले की, कदमवाकवस्तीला पहिले आयएसओ मानांकन राष्ट्रवादीच्या काळात मिळाले. सुसज्ज आणि सुंदर ग्रामपंचायत इमारत उभारण्यात आली. तसेच महाराष्ट्रात कोल्हापूरनंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अडीच हजार रुपयांचा दहन-दफन निधी देण्याचा निर्णय आमच्या कार्यकाळात घेण्यात आला, असा दावा त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर विकासाची ‘ब्लू प्रिंट’ असल्याचे सांगितले जाते, मात्र ती कुठेच दिसत नाही. ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत सत्ता मिळवली, पण प्रत्यक्षात ‘गाव भकास आणि स्वतःचा विकास’ झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.
विरोधकांकडून पाऊणे दोनशे कोटी रुपयांच्या विकासाचे दावे केले जात असून, त्या निधीचा तपशील जनतेसमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच या रकमेतील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
पाणी योजनेबाबत बोलताना काळभोर म्हणाले की, गावाला सध्या जे पाणी मिळत आहे, ती योजना आमच्या कार्यकाळातच सुरू करण्यात आली. या योजनेत सत्ताधाऱ्यांच्या काळात घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
अजित पवार यांच्याबाबत होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नंदू काळभोर म्हणाले की, महाराष्ट्राने आपला कोहिनूर हिरा गमावला असून राज्यभरातून दुःख व्यक्त केले जात आहे. अशा संवेदनशील विषयावर राजकारण करणे अत्यंत निष्ठुरपणाचे आहे, अशी टीका त्यांनी केली.
आम्ही पहिल्या दिवसापासून विकासाच्या मुद्द्यावरच जनतेकडे मतांची मागणी करत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून कदमवाकवस्ती परिसरात सातत्याने काम केले आहे. त्या कामाच्या जोरावरच आम्ही मतदारांसमोर उभे आहोत, असे सांगत विरोधकांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात कोणताही ठोस विकास झालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
शेवटी त्यांनी, अजित पवार यांच्या नेतृत्वावर आणि आमदार माऊली कटके यांच्या विश्वासावर उभे असलेले शीतल सुजित कांबळे, रेश्मा युवराज काळभोर आणि अमोल टेकाळे या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
पाऊणे दोनशे कोटीचा हिशोब जनतेला द्यावा
सत्ताधाऱ्यांच्या 8 वर्षाच्या काळात विकास जन्मालाच आला नाही अशी टीका नंदू काळभोर यांनी केली. विरोधक खोट बोलतात, रेटून बोलतात. दाप दडपशाही करतात असे ते म्हणाले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांकडून जनता काय अपेक्षा ठेवणार आहे. त्यांच्या काळात फक्त भ्रष्टाचाराची मालिका समोर आलेली आहे. ते सांगतात की, त्यांच्या कार्यकाळात पाऊणे दोनशे कोटीचा विकास झाला आहे. या पाऊणे दोनशे कोटीचा हिशोब सरपंचांनी जनतेला द्यावा. सत्ताधाऱ्यांनी पाऊणे दोनशे कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.







