संदीप बोडके

Pune Revenue Scam : पुणे : पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात 7/12 उताऱ्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली मोठा फेरफार झाल्याचे समोर आले असून यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे विभागातील 152 अधिकारी आता थेट महसूलमंत्र्यांच्या रडारवर आले आहेत. विशेषतः हवेली तालुक्यातील तत्कालीन 4 तहसीलदारांनी सन 2020 ते 2025 या काळात केलेल्या कामांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणातील व्याप्ती पाहता हवेली महसूल विभागातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा ठरू शकतो.
तपासणी अहवालानुसार, 152 अधिकाऱ्यांपैकी 15 जणांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, तर 82 जणांवर गंभीर आणि 55 जणांवर कामात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व अधिकाऱ्यांवर निलंबन, बदली किंवा विभागीय चौकशीची टांगती तलवार असल्याने महसूल विभागात भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी 7/12 उताऱ्यावरील मालकी हक्क बदलणे, जमिनीचे क्षेत्रफळ कमी-जास्त करणे आणि नवीन शर्तींचे शेरे बदलणे अशा प्रकारची कामे नियबाह्य पद्धतीने करण्यात आली आहेत. काही अधिकाऱ्यांनी तर आपल्या अधिकाराबाहेर जाऊन प्रांताधिकाऱ्यांचे अधिकार वापरून आदेश पारित केल्याचे उघड झाले आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत या घोटाळ्याची कबुली दिली असून दोषींवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. हवेली तालुक्यातील तहसीलदारपद मिळवण्यासाठी मंत्रालयातील लॉबीचा वापर करणारे अधिकारी आता कारवाईपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे यावेळेस त्यांना अभय मिळणार की कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घोटाळ्यात केवळ तहसीलदारच नाही, तर चुकीचे अहवाल सादर करणारे तलाठी, मंडल अधिकारी आणि कार्यालयीन टिपणी लिहिणारे महसूल नायब तहसीलदार व कारकून यांचाही समावेश आहे. ज्या प्रकरणांच्या फाईल्स कार्यालयातून गायब झाल्या आहेत, त्यांच्यावर सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी महसूल विभागाने केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यातील अनेक बड्या महसूल अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.







