पुणे, ता. 30 : पुणे शहरात गाडी अडवून सुमारे (Pune News) 25 लाखांहून अधिक किमतीचे साऊंड सिस्टीम साहित्य व सोन्याचे कडे लुटल्याची गंभीर घटना शुक्रवारी (ता.27 मार्च) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र एवढी गंभीर घटना घडूनही नऱ्हे पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. तक्रार देऊन तीन दिवस उलटूनही पोलिसांनी केवळ अर्ज स्वीकारून पुढील कारवाई न केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सिद्धार्थ शांताराम मोरे हे साऊंड सिस्टीम व्यवसायिक असून रामनवमीच्या कार्यक्रमासाठी धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे पाठवलेले साहित्य कार्यक्रमानंतर 27 मार्चच्या पहाटे परत आणले जात होते. वडगाव खुर्द येथील प्रयेजा सिटी कॅनल रोड परिसरात टाटा 1212 (एमएच 04 एलई 0305) ही गाडी जात असताना मयूर करपे, समीन सांधे व त्यांच्या 8 ते 10 साथीदारांनी गाडी आडवी लावून ती अडवली.
आरोपींनी कर्मचाऱ्यांना गाडीतून खाली उतरवून त्यांचे मोबाईल काढून घेतले. चालक रमेश पटाले यांनी विरोध केल्यावर त्यांना गाडीतून ओढून काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी गाडीतील संपूर्ण साऊंड सिस्टीम साहित्य जबरदस्तीने खाली उतरवून ते स्वतःसोबत आणलेल्या विनानंबर प्लेटच्या चारचाकी व दोन स्कूटरमध्ये भरून नेले.
या लुटीत यामाहा डिजिटल मिक्सर, पावर अॅम्प, क्रॉसओव्हर, सीडी प्लेअर्स यांसह अत्याधुनिक डीजे उपकरणे आणि चालकाच्या हातातील सुमारे 39.76 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे असा एकूण 25 लाख 74 हजार 200 रुपयांचा माल लंपास करण्यात आला आहे. घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ 100 क्रमांकावर फोन करून मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून कर्मचाऱ्यांना धीर दिला. मात्र त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा गंभीर आरोप तक्रारदार सिद्धार्थ मोरे यांनी केला आहे.
‘गुन्हा दाखल करण्यासाठी कोणाची वाट पाहत आहेत?’
तक्रार अर्ज नऱ्हे पोलिस ठाण्यात 27 मार्च रोजी सादर करण्यात आला. मात्र तीन दिवस उलटूनही गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याने तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली आहे. “एवढी गंभीर लूट, मारहाण आणि लाखो रुपयांचे साहित्य चोरीला जाऊनही पोलिस केवळ अर्जावरच थांबले आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस नेमकी कोणाची वाट पाहत आहेत?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
ही घटना शहरातील गजबजलेल्या परिसरात पहाटेच्या वेळी घडूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. गुन्हा नोंदविण्यात झालेल्या विलंबामुळे नऱ्हे पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.







