पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका (PMC) प्रशासनाने मिळकतकर थकबाकी वसूल करण्यासाठी सुरू केलेल्या ‘अभय योजने’ला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत 6 कोटी 28 लाख रुपयांची थकबाकी जमा झाली. शनिवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 1127 थकबाकीदारांनी या सवलतीचा लाभ घेतला. मात्र मागील ‘अभय योजने’चा लाभ घेतलेल्या थकबाकीदार मिळकतदारांना मात्र या सवलतीचा फायदा मिळणार नाही.

या योजनेअंतर्गत, थकबाकीदार नागरिकांना त्यांच्या थकीत मिळकतकरावर पुणे महापालिकेने दरमहा दोन टक्के (2%) दराने आकारलेल्या दंडाच्या रकमेवर सुमारे 75 टक्के सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ही वाढलेली थकबाकी भरण्यासाठी नागरिकांना मोठी संधी मिळाली आहे.
पुणे महापालिकेकडे मिळकतकराची एकूण थकबाकी 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या प्रचंड रकमेत जुन्या हद्दीतील 6 लाख 37 हजार 609 मिळकतींचा समावेश आहे, ज्यात 9 हजार कोटी रुपये दंड आणि 3 हजार 158 कोटी मूळ कराची रक्कम आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही योजना 15 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजेच दोन महिने चालणार आहे.
मिळकतकराची थकबाकी वर्षानुवर्षे थकीत असल्याने महापालिका दर महिन्याला त्यावर दोन टक्के व्याज (दंड) आकारते, ज्यामुळे थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
योजनेला मिळालेल्या दमदार प्रतिसादासाठी महापालिकेने मोठी तयारी केली होती. दरम्यान, वाढलेली थकबाकी वसूल करण्यासाठीच प्रशासनाने ही सवलत योजना आणली आहे.







