पुणे: पुणे (Pune News) शहरात सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा ठरत असतानाच वारजे माळवाडी पोलिसांनी दोन मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावून मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 774 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 19 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत 1 कोटी 50 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणातील धक्कादायक सत्य म्हणजे उत्तमनगर येथे झालेल्या एका मोठ्या घरफोडीत फिर्यादीचा जवळचा नातेवाईकच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलिसांच्या तपास पथकाने यशस्वी केली आहे. अरविंद प्रल्हादसिंग राजपुरोहित नावाच्या आरोपीने आपल्याच नातेवाईकाच्या घराचे कुलूप तोडून 580 ग्रॅम सोने आणि 4.5 लाख रुपयांची रोकड चोरली होती. पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अरविंदला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पुणे पोलिसांनी या कारवाईनंतर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सुट्ट्यांच्या काळात बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याने घराबाहेर जाताना मौल्यवान दागिने आणि मोठी रोकड बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे सुरक्षित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.







