पुणे, ता. 2: पब्जी (Pune News) गेम खेळताना झालेल्या ऑनलाईन ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला पुण्यातील विशेष सत्र न्यायालयाने (पॉक्सो) जामीन मंजूर केला आहे.

आरोपी प्रणय सिंघा (रा. नागरकाटा, पश्चिम बंगाल) असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश (पॉक्सो) के.डी.शिरभाते सो यांच्या कोर्टाने हे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. सिद्धांत बडेकर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन पब्जी गेम खेळताना एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख पश्चिम बंगालमधील तरुणाशी झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच, मुलगी प्रियकरासोबत घर सोडून पश्चिम बंगालला गेली. या प्रकरणात पोलिसांनी मुलीचा शोध घेत तिला सुरक्षित परत आणले. मात्र, पुढील तपासात प्रियकराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिस तपासात, आरोपी प्रणय सिंघा (रा. नागरकाटा, पश्चिम बंगाल) याला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात अपहरण व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तसेच पॉस्को कायद्याअंतर्गत कलमे लावण्यात आली होती.
आरोपीविरुद्ध पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आरोपी कारागृहात असताना आरोपीने अॅड. सिद्धांत बडेकर यांच्या मार्फत पुण्यातील विशेष सत्र न्यायालय (पॉक्सो) येथे जामिनाचा अर्ज दाखल केला होता. यावेळी बडेकर यांनी कोर्टात आरोपी व पीडिता यांचे संमतीने संबंध झाले आहेत. तसेच सदर प्रकरणात तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले असल्याचा युक्तिवाद ॲड सिद्धांत बडेकर यांनी कोर्टात केला. त्यांना ॲड सिध्दार्थ तांबे यांनी सहकार्य केले. आरोपी पक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के.डी.शिरभाते सो यांच्या कोर्टाने आरोपीस सशर्थ जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केले आहेत.







