पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (Pune News) सध्या ‘माणूस विरुद्ध बिबट्या’ असा संघर्ष शिगेला पोहोचला असून, जुन्नर तालुक्यातील नारायणवाडीत एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला असला तरी दुसरा अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमधील दहशत कायम आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या पट्ट्यात बिबट्यांचा वावर वाढण्यामागे एक महत्त्वाचे भौगोलिक कारण आहे. सध्या उसाची तोडणी अंतिम टप्प्यात आहे. उसाची शेते रिकामी झाल्यामुळे बिबट्यांचे नैसर्गिक आश्रयस्थान नष्ट झाले असून, ते आता भक्ष्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळत आहेत.

पकडलेल्या बिबट्यांना जुन्नरमधील ‘माणिकडोह बिबट निवारा केंद्रात’ ठेवले जाते. मात्र, या केंद्राची क्षमता आता संपत चालली आहे. नुकतेच 20 बिबटे गुजरातला हलवण्यात आले असले, तरी दररोज नवीन बिबटे जेरबंद होत असल्याने यंत्रणेवर मोठा ताण आहे.
केवळ पिंजरे लावून बिबटे पकडणे हा या समस्येवरचा अंतिम उपाय नाही. बिबट्यांची वाढती संख्या पाहता त्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे प्रलंबित आहे. दरम्यान, जोपर्यंत शासन स्तरावर दीर्घकालीन धोरण आखले जात नाही, तोपर्यंत ग्रामीण भागातील हा संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे नागरिकांनी सांगितलं आहे.







