Pune News : पुणे ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीने पोलीस मुख्यालय येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसाराचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्नेहल तावरे (संचालक, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट व स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे), डॉ. प्रकाश पंधारे (निवृत्त प्राचार्य), अविनाश हळबे, सु. ल. खुटवड (मराठी लेखक व पत्रकार) तसेच मिलिंद शिंत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी भूषविले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रविंद्र चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे व ‘ज्ञानेश्वरी’चे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. 27 फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यकृतींमधून मराठी भाषेला अभिमानाची ओळख मिळवून दिली आणि सामाजिक जाणीवा जागृत केल्या.
मान्यवरांनी मार्गदर्शन करताना मराठी भाषेची उत्क्रांती, तिचा प्रचार-प्रसार आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी असलेले नाते यावर सविस्तर भाष्य केले. आज मराठी भाषा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून परदेशातही तिचे शिक्षण दिले जाते, याची माहिती देण्यात आली. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभारात फारसीऐवजी संस्कृत व स्थानिक मराठी शब्दांचा वापर रुजवून ‘राज्यव्यवहार कोश’ मराठीत तयार केला आणि प्रशासनात मराठीची भक्कम पायाभरणी केली, याचा उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांनी केले.






